शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजामाता नगर परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणी ही इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ती ‘कॉलेजला जाते, उशीर होईल’ असे सांगून घरातून निघाली होती.
मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तत्काळ तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. कॉलेज तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे ती कुठेतरी निघून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेगाव शहर पोलिसांनी मिसिंग प्रकरण दाखल करून तरुणीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.













