Advertisement Advertisement

देऊळगाव राजा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा!पिंपळनेरमध्ये ४७ हजार ८८५ किलो मसाला जप्त; तब्बल ६० लाखांचा माल ताब्यात! अस्वच्छता, कीटकांचा वावर अन् परवान्याचा घोळ; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सण-उत्सवांच्या काळात बाजारात मसाल्यांची मागणी वाढत असतानाच मसाल्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल ४७ हजार ८८५ किलो मसाल्यांचा साठा जप्त केला आहे. या साठ्याची एकूण किंमत ६० लाख ८९ हजार ६४६ रुपये आहे. उत्पादनस्थळी अस्वच्छता, कीटकांचा वावर, आवश्यक चाचणी अहवालांचा अभाव आणि परवान्याबाबत अनियमितता आढळल्याने दोन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत २५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मे. जनता सेवा मिरची मसाला इंडस्ट्रीज, पिंपळनेर या आस्थापनेची तपासणी केली असता परिसरात अस्वच्छता, मांजर, कबुतरे आणि कीटकांचा वावर आढळून आला. तसेच कीटक नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना नसणे, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचे अभिलेख उपलब्ध नसणे, अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवणे आणि उत्पादनांचे चाचणी अहवाल उपलब्ध नसणे, अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.

याशिवाय ‘जेएसएम’ ब्रँडच्या कांदा-लसूण मसाल्याच्या लेबलवरही त्रुटी आढळल्या. तसेच काही मसाले कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून प्रशासनाने सुटी मिरची पावडर, हळद पावडर आणि अख्खी हळद असा एकूण ४७ हजार ३८१ किलो मसाल्यांचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत ५७ लाख ९५ हजार ८४६ रुपये असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

परवान्याची जागा सोडून दुसरीकडेच व्यवसाय!

याच ठिकाणी मे. अनोखे फूड्स अँड स्पाइसेस, पिंपळनेर या आस्थापनेचा मसाला साठा आणि पॅकिंग साहित्यही आढळून आले. प्रशासनाच्या तपासणीत परवान्यामध्ये नमूद असलेल्या गट क्रमांक ८१ येथील जागेवर प्रत्यक्ष कामकाज सुरू नसल्याचे, तर दुसरीकडे वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ‘अनोखे’ ब्रँडची २३८ किलो लाल मिरची पावडर, २०८ किलो हळद पावडर आणि ५८ किलो धने पावडर असा एकूण ५०४ किलो मसाला साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ९३ हजार ८०० रुपये आहे.

ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

सण-उत्सवांच्या काळात मसाल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मसाल्यांचे उत्पादन आणि पॅकिंग करताना स्वच्छतेचे नियम पाळणे, कीटक नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पिंपळनेर येथील या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जप्त केलेल्या मसाल्यांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल काय येतात आणि प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!