Advertisement Advertisement

शेळ्यांनी पीक खाल्लं अन् दोन गटांत तुफान राडा!कुणाच्या डोक्यात दगड, तर कुणाच्या डोळ्याखाली कुऱ्हाडीच्या दांड्याचा मार; देऊळगाव राजा पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेळ्यांनी शेतातील तुरीचे पीक आणि घरासमोरील झाडांचे नुकसान केल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन मारहाणीची घटना घडली. सोमवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास खल्याळ गव्हाण परिसरात हा प्रकार घडला. या वादात एका व्यक्तीच्या डोक्याला, तर दुसऱ्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याखाली दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरासमोरील झाडांवरून वाद, डोक्यात दगड मारल्याचा आरोप! दिनकर चंद्रभान नाडे (वय ५५, रा. खल्याळ गव्हाण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते शेतात जात असताना शेळ्या घरासमोरील झाडे खात असल्याच्या कारणावरून त्यांची ज्ञानदेव एकनाथ वायाळ यांच्यासोबत चर्चा सुरू झाली. या चर्चेचे रूपांतर वादात झाले. यावेळी ज्ञानदेव वायाळ यांनी शिवीगाळ करून डोक्यात दगड मारल्याचा आरोप नाडे यांनी केला आहे. तसेच गणेश ज्ञानदेव वायाळ यांनी दगडाने पाठीवर मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

तुरीचे पीक शेळ्यांनी खाल्ल्याने दुसऱ्या बाजूनेही तक्रार! दुसरीकडे, ज्ञानदेव एकनाथ वायाळ यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनकर नाडे यांच्या शेळ्यांनी शेतातील तुरीचे पीक खाल्ल्याने त्यांनी शेळ्यांच्या देखभालीबाबत विचारणा केली. याच कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी दिनकर नाडे यांनी हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने उजव्या डोळ्याखाली मारून दुखापत केल्याचा आरोप ज्ञानदेव वायाळ यांनी केला आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि रुद्रा दिनकर नाडे यांनी शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

शेळ्यांच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी आरोप करण्यात आले असून, देऊळगाव राजा पोलिसांनी दोन्ही तक्रारींच्या आधारे स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!