देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रोजगारासाठी परराज्यातून पुण्याच्या दिशेने निघालेल्या तरुणावर काळाने वाटेतच घाला घातला. मेहकर-जालना राज्य महामार्गावरील रोहेरी बुद्रुकजवळ सोमवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सचिन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या सहकारी कामगारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जेवणासाठी थांबले, अन् घडली दुर्दैवी घटना!
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील १४ कामगार रोजगाराच्या शोधात पुण्याला जात होते. प्रवासादरम्यान हे सर्व कामगार रोहेरी बुद्रुकजवळील राजमाता हॉटेल येथे जेवणासाठी थांबले होते. याचवेळी सचिन कुमार हा काही अंतरावर फिरण्यासाठी गेला असताना जालन्याहून मेहकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन गंभीर जखमी झाला; मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला.
धडक देऊन चालक वाहनासह पसार!
अपघात घडताच मालवाहू वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. रोजगारासाठी घरापासून दूर निघालेल्या तरुणाचा प्रवासातच दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
किनगाव राजा पोलिसांकडून तपास सुरू….
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार संजय मारोतीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या मालवाहू वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.













