Advertisement Advertisement

डोणगावच्या सरकारी दवाखान्यातच कर्मचाऱ्यांचा राडा!रुग्णांची वर्दळ सुरू असतानाच दोन कर्मचाऱ्यांत हाणामारी!दवाखान्यात उपचार सुरू की कर्मचाऱ्यांची दंगल? चर्चेला उधाण!वैद्यकीय अधिकारी ॲक्शन मोडवर; दोघांनाही कारणे दाखवा नोटीस!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी घडली. डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णसेवेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमधील वादाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या घटनेची दखल घेत वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांनी संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज सुमारे ३०० बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते. तसेच प्रसूती आणि अपघातात जखमी झालेल्या रुग्णांनाही उपचारासाठी येथे आणले जाते. त्यामुळे या आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांची वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणीच दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास दोन कर्मचाऱ्यांमध्ये प्रथम शाब्दिक वाद झाला. मात्र, हा वाद पुढे वाढत जाऊन त्याचे रूपांतर झटापटीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णांची ये-जा सुरू असताना आरोग्य केंद्राच्या आवारात हा प्रकार घडल्याने रुग्णसेवेच्या ठिकाणी शिस्त राखण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दोघांच्या खुलाशानंतर पुढील कारवाई

या घटनेची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांनी संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला कर्मचारी काय उत्तर देतात आणि त्यांचा खुलासा तपासल्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळणे ही आरोग्य केंद्राची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे रुग्णसेवेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!