मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, घटना घडली त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेत तिघे युवक तिच्या घरासमोर आले. त्यापैकी एका युवकाने वाईट उद्देशाने मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच, ती त्याच्याशी का बोलत नाही, अशी विचारणाही त्याने केली.
दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनीही मुलीवर त्याच्याशी बोलण्याचा आणि प्रेमसंबंध ठेवण्याचा आग्रह धरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मुलगी घाबरली. घटनेनंतर तिच्या आई-वडिलांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणाची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तिन्ही युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.













