धरणासाठी जमिनी दिल्या, घरे बुडाली; आता उभी पिकंही वाळू द्यायची का?खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांचा संताप उसळला! मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे माघार; कारवाईविनाच परतावे लागले!
इसरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धरणासाठी जमिनी आमच्या गेल्या, घरे बुडाली; आता उभी पिकं जगवण्यासाठीही संघर्ष करायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित करत खडकपूर्णा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईला जोरदार विरोध केला. शेतातील पाणी उपसणाऱ्या मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कारवाई न करताच परतावे लागल्याची माहिती समोर आली आहे. आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकांना पाणी देण्याचा हक्क हिरावून घेऊ नका, अशी भूमिका घेत प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या.
सोमवारी सकाळी प्रकल्पाचे शाखा अभियंता राजगुरू यांच्यासह पोलीस, महसूल आणि महावितरणचे कर्मचारी कारवाईसाठी परिसरात दाखल झाले. ही माहिती मिळताच परिसरातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. उभी पिके जगवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असताना मोटारी बंद करण्याचा निर्णय नेमका कोणत्या आधारावर घेतला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पिके हाताशी आली असताना पाणी बंद केल्यास मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मोटारी अनधिकृत म्हणता, मग धरणातील बोटी अधिकृत आहेत का?
शेतातील पाणी उपसणाऱ्या मोटारी अनधिकृत असल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाई केली जात असेल, तर धरणात वाळूउपसा करणाऱ्या बोटी अधिकृत आहेत का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवते; मग धरणातील बोटींच्या अधिकृततेबाबतही तितकीच तत्परता का दाखवली जात नाही, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रशासनाच्या कथित दुजाभावावर बोट ठेवले. धरणातील बोटींच्या अधिकृततेबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पीक हाती येईपर्यंत पाणी सुरू ठेवा!
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पीक हाती येईपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली. विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने साखर कारखान्यांशी तातडीने संपर्क साधावा. ऊसतोड टोळ्या पाठवून शेतातील ऊस लवकरात लवकर कारखान्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
नुकसान झालं तर जबाबदारी कोण घेणार?
खडकपूर्णा प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी आणि घरांचा त्याग केला. मात्र, आता उभी पिके जगवण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाणी बंद केल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करत प्रकल्पग्रस्तांच्या पाणीवापराबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
या आंदोलनात युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिन कदम, चिंचखेडचे सरपंच रामेश्वर वायाळ, माजी सरपंच मार्तंड वायाळ, सुरेशराव वायाळ, रविराज देशमुख, विष्णू भुतेकर, वाल्मिक देशमुख यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.













