Advertisement Advertisement

दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, आता चोरट्यांचाही डल्ला!टाकरखेड भागिले येथून सोयाबीन लंपास; शेतकऱ्याला २४ हजार ८०० रुपयांचा फटका!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता शेतमाल चोरीच्या घटनांची भर पडत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागिले येथे शेतातून चार क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मळणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या चार पोत्यांवर डल्ला मारल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.

टाकरखेड भागिले येथील शेतकरी सुदाम विनायक भागिले (वय ६३) यांच्या सर्व्हे क्रमांक १६ मधील शेतात ही चोरी झाली. त्यांनी शेतात सोयाबीनची मळणी करून चार पोत्यांमध्ये माल भरून ठेवला होता. मात्र, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत चारही पोती लंपास केली. चोरीला गेलेल्या सोयाबीनचे वजन चार क्विंटल म्हणजेच ४०० किलो असून, त्याची अंदाजे किंमत २४ हजार ८०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही घटना २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे. सोयाबीन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी सुदाम भागिले यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दुष्काळात उरलं-सुरलं पीकही असुरक्षित!

यंदा दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यातच शेतात कष्टाने पिकवलेला आणि मळणी करून ठेवलेला शेतमालही चोरीला जाऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी शेतमालाची राखण करायची तरी किती, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ग्रामीण भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि शेतमाल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!