पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : आळंदी येथे AVN (Avascular Necrosis), स्पाईन व सांध्यांच्या विविध विकारांवर आधारित ५ दिवसीय भव्य आयुर्वेद न्युरोथेरपी व न्युरोपंचकर्म शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराला महाराष्ट्रासह देशभरातून शेकडो रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घेतला. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शन सुप्रसिद्ध आयुर्वेद वाचस्पती डॉ. पंढरी इंगळे यांनी केले. त्यांनी रुग्णांना त्यांच्या आजारानुसार सखोल मार्गदर्शन करत विनाऑपरेशन आयुर्वेदिक उपचारांची प्रभावीता स्पष्ट केली.
शिबिरामध्ये न्युरोपंचकर्म, न्युरोथेरपी, विध्दकर्म व अग्निकर्म या आधुनिक व पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले. या उपचारांमुळे अनेक रुग्णांच्या वेदना कमी होऊन हालचालीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. रुग्णांनी उपचारांमुळे झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल समाधान व्यक्त केले. अनेक रुग्णांनी ऑपरेशन टाळून आयुर्वेदिक उपचारांमुळे लाभ झाल्याचे सांगितले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये डॉ. अतुलसिंह परदेशी, श्री गोविंद कुर्हाडे पाटील, श्री योगेश प्रतापसिंह, डॉ. सौ. पद्मा खरड, डॉ. शिवकुमार बायस, श्री काशिनाथ सिंह ठाकूर व श्री परमेश्वर सावंत यांचा समावेश होता. तसेच शिबिरादरम्यान विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
या शिबिरात केवळ उपचारच नव्हे तर रुग्णांना योग्य आहार, दिनचर्या, योग-प्राणायाम व जीवनशैली याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली. एकूणच, आळंदी येथे आयोजित या ५ दिवसीय आयुर्वेद शिबिराने AVN व स्पाईन विकारांवरील उपचारांसाठी प्रभावी पर्याय उपलब्ध करून दिला असून भविष्यात अशा शिबिरांचे आयोजन अधिक व्यापक प्रमाणात करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
















