मेहकर/डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गरजू रुग्णांना वेळेवर व नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाने २०२३ मध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू केली. शहरी भागातील कामगार, सर्वसामान्य नागरिक आणि गरजू रुग्णांना सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरापर्यंत उपचार मिळावेत, हा या योजनेमागील मुख्य हेतू होता. मात्र मेहकर येथील ‘आपला दवाखाना’कडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या नियमानुसार दवाखाना किमान आठ तास सुरू राहणे अपेक्षित असताना मेहकर येथील दवाखाना केवळ दोन तासच सुरू ठेवला जात असल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर फिल्डवरील आरोग्यविषयक कामेही नियमितपणे होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, दवाखाना नेमका कोणत्या वेळेत सुरू असतो, याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातच अशी परिस्थिती असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर उपचार मिळावेत, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना प्रत्यक्षात मात्र उद्देशापासून दूर गेल्याचे चित्र दिसत आहे.
रुग्णांचा आरोप आहे की, केवळ दोन तास दवाखाना सुरू ठेवून पूर्ण पगार घेतला जात असून, आरोग्य विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
“‘आपला दवाखाना’मध्ये नियमानुसार ओपीडी होत नसेल किंवा शासनाने दिलेली फिल्डवरील कामे केली जात नसतील, तर संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल.”
– डॉ. रंजीत मंडाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा















