मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली खरीप पिके जगवायची कशी, जनावरांची तहान भागवायची कशी आणि पुढील काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीत पिकांना पाणी मिळावे, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. यावेळी ‘शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही, हा शब्द देतो; मात्र जास्त स्वार्थ बाळगू नका. रब्बी पिकांची पेरणी करू नका आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा,’ असे आवाहन ना. जाधव यांनी केले. या बैठकीला माजी आमदार संजय रायमूलकर उपस्थित होते.
पिके जगवायची कशी? शेतकरी संकटात!
यंदा अत्यल्प आणि अनियमित पावसामुळे शेतीचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. हळद, तूर यांसह इतर पिकांच्या पेरणीपासून निगराणीपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने ही पिके हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच पेनटाकळी, कोराडी आणि उतावळी आदी प्रकल्पांतील पाणीसाठा राखीव ठेवण्यात आल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीजजोडण्या तोडण्यात आल्यानेही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिके जगविण्याची चिंता असतानाच जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होत चालला आहे. त्यामुळे प्रकल्पांतून पाणी सोडून पिकांना जगविण्याची संधी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांची गर्दी; शेतकरी भवनात बैठक….
शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने २५ ऑक्टोबर रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालयाऐवजी शेतकरी भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत पिके वाचविण्यासाठी पाणी मिळण्याची गरज अधोरेखित केली. पेरणीपासून पिकांच्या संगोपनापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमूलकर यांच्याकडे पाण्याची मागणी केली.
प्रकल्पांत केवळ १६ टक्के पाणीसाठा; जाधवांनी मांडले वास्तव!
बैठकीत बोलताना ना. प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी दुप्पट आरक्षण, पाण्याचे सुमारे ३० टक्के बाष्पीभवन आणि पुढील वर्षासाठी १० टक्के पाणी राखीव ठेवण्याचा विचार करता प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध पाणी अत्यंत मर्यादित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, जनावरांची तहान आणि शेतीची गरज या तिन्ही बाबींचा विचार करून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचीही अडचण निर्माण होऊ शकते, अशी परिस्थिती त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली.
‘मीसुद्धा शेतकरीच’; भूमिपुत्राच्या आश्वासनाने शेतकऱ्यांना दिलासा….
आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील संकटांची आपल्याला जाणीव आहे, असे सांगत ना. प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र पाणीटंचाईचे वास्तव लक्षात घेऊन रब्बी हंगामातील पेरणी टाळावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सध्या खरीप पिके वाचविणे हेच मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांना प्रत्यक्ष पाणी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













