भंडारा (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मोहदुरा गावात एक लाजिरवाणी अन् संतापजनक घटना समोर आली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन लेकरावर तिच्याच मैत्रिणीच्या बापानं अत्याचार केल्याची माहिती समोर येताच गावभर खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी रात्री घडली, तर शुक्रवारी सकाळी उघड झाली.
माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीच्या मुलीसोबत एकाच वर्गात शिकते. दोघी जिवलग मैत्रिणी असल्यामुळे मुलगी तिच्या घरी थांबली होती. त्याचाच फायदा घेत आरोपी सोमा सालिक मेश्राम (वय ३७) यानं तिला दुचाकीवर फिरायला नेतो म्हणत सोबत नेलं. नंतर गुंजेपारजवळ मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
शुक्रवारी सकाळी मुलीनं घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. ही बातमी गावात पसरताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. धक्क्यातून मुलीनं विष प्राशन केल्याचं सांगितलं जात असून तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी सोमा मेश्राम याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी गावकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.













