देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आवैध रेती वाहतुकीवर महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेतीमाफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. मेहुणा राजा शिवारात विना परवान्याने रेती वाहतूक करणारा एक टिप्पर महसूल पथकाने जप्त केला आहे.
ही कारवाई १० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. खडकपूर्णा धरण कमान येथून कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्ती दरम्यान पथकाला संशयास्पद टिप्पर आढळला. तपासणी केली असता टिप्परमध्ये चार ब्रास रेती भरलेली असल्याचे दिसून आले.
वाहन चालकाकडे आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई करत टिप्पर ताब्यात घेतला. पुढील कार्यवाहीसाठी वाहन देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. यामध्ये महसूल मंडळाधिकारी विजय हिरवे आणि महसूल सेवक शरद काकडे यांनी सहभाग घेतला.
प्रशासनाने अवैध रेती वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली असून पुढील काळातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत या घटनेतून मिळत आहेत.













