Advertisement Advertisement

करवंड महोत्सव मध्ये खांबा-खांबावर संजूभाऊचे बॅनर; बाकी पुढारी बॅनर साठी जागा शोधतायत?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील  करवंड महोत्सव सुरू होण्याच्या आधीच राजकीय रंग चांगलाच चढलेला दिसतोय. चिखली विधानसभा मतदारसंघात आज होणाऱ्या या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना, गावात मात्र बॅनरबाजीवरून वेगळाच माहोल तयार झालाय. मुख्य आयोजक आमदार श्वेताताई महाले असल्या तरी, एक दिवस आधीच म्हणजे काल संजूभाऊ गायकवाड यांचे स्वागताचे फ्लेक्स गावभर झळकले आणि सगळ्यांचंच लक्ष तिकडे गेलं.

करवंड गावातील चौक-चौकात, खांबा-खांबावर संजूभाऊंचे फोटो दिसू लागल्याने चर्चा रंगल्या आहेत. गावकरीही म्हणू लागले, “अहो, कार्यक्रम श्वेताताईंचा आणि बॅनर आधी संजूभाऊंचे!” त्यामुळे राजकीय वातावरणात हलकीशी खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महोत्सवापेक्षा बॅनरच जास्त चर्चेत आलेत. अशी चर्चा आता करवंड मध्ये सुरू झाली आहे.

हे बॅनर पाहताच बाकी पक्षाचे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच धावपळ सुरू झाली. कुठे बॅनर लावायचे, कोणती जागा मोकळी आहे का, याचा शोध घेत कार्यकर्ते गावभर फिरताना दिसत आहेत. मोठमोठे फ्लेक्स आणले गेले असून ते लावण्यासाठी जागा मिळवणं हेच आता मोठं आव्हान बनलंय.

यात अजून भर म्हणजे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात आणि सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांचेही काही फ्लेक्स गावात लागलेले दिसून येत आहेत. त्यामुळे हा महोत्सव आता केवळ सांस्कृतिक न राहता, राजकीय ताकदीचं प्रदर्शन बनत चालल्याची चर्चा रंगतेय.

दरम्यान, श्वेताताईंचे भलेमोठे बॅनरही आता करवंडमध्ये पोहोचले असून, काही ठिकाणी ते लावण्याचं काम सुरू आहे. आजच्या महोत्सवात नेमकं कोणाचं वर्चस्व दिसणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गावात सध्या एकच चर्चा — “महोत्सव आहे की बॅनरांची स्पर्धा!”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!