नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : परीक्षेचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शहरातील हनुमाननगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हनुमाननगर येथील रहिवासी संतोष रामदास भिवटे यांची मुलगी साक्षी संतोष भिवटे (वय १८) ही दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता “कोठारी हायस्कूलमध्ये पेपर देण्यासाठी जात आहे,” असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
वडील संतोष भिवटे यांनी तात्काळ कोठारी हायस्कूल, बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र सर्वत्र शोध घेऊनही साक्षीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी संदीपसिंग सोळंके करत आहेत.
दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे.













