Advertisement Advertisement

तिहेरी अपघात..! समृद्धीवर धडाधड धडका; मदतीला धावलेलेही जखमी …

मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावर १० एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. चॅनेल क्रमांक २९३ (मुंबई कॉरिडॉर) येथे वाहनांची एकामागून एक धडक होऊन एकच गोंधळ उडाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी तर ५ जण किरकोळ जखमी झाले. विशेष म्हणजे मदतीसाठी धावून आलेले ट्रक चालक आणि एमएसएफ जवानही या अपघातात सापडले.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील शशांक कृष्णा खेरणार (वय २५) हे आपल्या नेक्सा कारने मुंबईकडे जात असताना त्यांनी समोरील अज्ञात वाहनाला जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत सुरू असतानाच पाठीमागून येणाऱ्या औरा कारने पुढील इनोव्हा कारला जबर धडक दिली. या धडकेमुळे औरा व इनोव्हा कार पुढे जाऊन नेक्सा कारवर आदळल्या आणि अपघात अधिकच भीषण झाला.

या दुसऱ्या अपघातात मदतीसाठी थांबलेले ट्रक चालक मोईजोद्दीन शेख (रा. वसई) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच एमएसएफ जवान आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे व फायरचे जवान परमेश्वर शिंदे हे किरकोळ जखमी झाले. औरा कारमधील अमित बोंडे व तेजस वाघोरे यांनाही दुखापत झाली असून चालक अक्षय चनाप (रा. बार्शी टाकळी) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.सुदैवाने इनोव्हा चालक निजाम खान वकील खान हे सुरक्षित बचावले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व क्यूआरव्ही पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी एकाला जालना तर दुसऱ्याला मुंबई येथे नातेवाईकांनी हलविले असल्याची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!