देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी म्हणून मेधा सतीश घाटे, तन्मय प्रकाश घाटे आणि राहुल ओमकार घाटे (तिघेही रा. साईनगर, देऊळगाव राजा) यांची नावे समोर आली आहेत.
ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता संजय नगर येथे घडली. तक्रारदार महिला घरी एकटी असताना आरोपी थेट घरात घुसले. त्यांनी ‘इकबाल खान कुठे गेले?’ अशी विचारणा केली. संबंधित व्यक्ती घरी नसल्याचे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला.
वाद चिघळल्याने आरोपी तन्मय घाटे याने महिलेच्या उजव्या पायाच्या मांडीवर चाकूने वार करून जखमी केले. तसेच उर्वरित दोघांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देत मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यामुळे संबंधित महिलेने स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, घरात घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे संजय नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.













