डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गावात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढलं असून वार्ड क्रमांक २ मधल्या खंडोबा भागात धाडसी चोरीची घटना घडली आहे. डॉक्टर गजानन पातुरकर यांचं बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोनं-चांदीसकट लाखोंचा ऐवज लंपास केला. ही चोरी ९ ते १३ एप्रिलच्या दरम्यान घडल्याचं समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर पातुरकर हे ९ एप्रिलला घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी फिरायला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधल्या कपाटाचा फडशा पाडत सोन्याच्या अंगठ्या, झुमके, नथ, गंठण आणि चांदीच्या वस्तूंवर हात साफ केला.
या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद केली आहे. मात्र, ही किंमत जुन्या पावत्यांवरून लावल्यामुळे प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास साडेदहा तोळं सोनं आणि अर्धा किलो चांदी चोरीला गेली आहे.
डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धिके करत आहेत.
दरम्यान, गावात याआधीही अशा चोरीच्या घटना घडल्या असून अनेक प्रकरणांचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून “चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार?” असा सवाल नागरिक करत आहेत.













