Advertisement Advertisement

केवळ अभियंताच जबाबदार? जाफराबाद चौफुली अपघात प्रकरणाची चौकशीची मागणी…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील जाफराबाद चौफुली परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकाराला केवळ संबंधित अभियंताच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

देऊळगाव राजा शहरासाठी वळण रस्त्याची आवश्यकता लक्षात घेऊन सन १९९८ मध्ये या प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. जालना ते खामगाव मार्गाचा भाग म्हणून सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा हा वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला. या रस्त्याचे रेखांकन अकोला येथील संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर ‘अपेक्स पॉईंट’ निश्चित करून विकास आराखड्यात नोंदही करण्यात आली होती.

मात्र, हा रस्ता अनेक ठिकाणी खाजगी शेतजमिनीमधून जात असल्याने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे प्रकरण दोन वेळा व्यपगत झाले. त्यानंतर सन २००१ मध्ये शासनाने ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) योजनेअंतर्गत या वळण रस्त्यास मंजुरी दिली.

दरम्यान, सुरुवातीला निश्चित केलेल्या डिझाइननुसार काम होणे अपेक्षित असताना संबंधित अभियंत्यांनी काही ठिकाणी बदल केल्याचा आरोप आहे. कथितरीत्या आर्थिक फायद्यासाठी मूळ रेखांकनात फेरफार करण्यात आल्याने रस्त्याची रचना बिघडली. परिणामी जाफराबाद चौफुली परिसरात अपघातांची मालिका सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, सुरुवातीच्या मंजुरीवेळी तयार करण्यात आलेले मूळ डिझाइन व विकास आराखड्यातील नकाशांची तपासणी करण्यात यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!