सिंदखेड राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहराच्या विकासासाठी गेल्या वीस वर्षांत ठोस काम न करणारेच आज केवळ तीन महिन्यांत सर्व प्रश्न सोडवण्याची अपेक्षा ठेवत आहेत, अशी टीका करत सौरभ तायडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, विकासकामांमध्ये अडथळे न आणता सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
येथील विश्रामगृहात १३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शहराच्या विविध विकासकामांसंदर्भात स्थानिक आमदार मनोज कायंदे यांची भेट घेतली असता, “माझ्या पक्षात प्रवेश करा, कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देतो,” असा प्रस्ताव दिल्याचा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना सौरभ तायडे म्हणाले की, विरोधकांनी आमच्यावर आरोप केले तर त्यांच्या वीस वर्षांच्या कारभारातील कथित भ्रष्टाचारही जनतेसमोर मांडू. शहराच्या विकासाऐवजी काही जण केवळ राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जिजाऊ जन्मस्थान विकासाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, या आराखड्याची फाईल मंत्रालयात अस्तित्वात नसल्याचा गंभीर मुद्दा मांडला. “आमदारांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी,” अशी मागणी त्यांनी केली.
नगरपरिषद पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना व इतर मूलभूत सुविधांसाठी प्रयत्नशील असूनही काही जण मुद्दाम अडथळे निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले. “ठेकेदारांना फोन करून कामे अडवण्याचा प्रयत्न का केला जातो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून नागरिकांच्या हिताच्या कामांना गती दिली जाईल. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















