Advertisement Advertisement

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्हा सज्ज! १८ मतदान केंद्रांवर आज मतदान; ९ हजार १२४ शिक्षक मतदार बजावणार हक्क! सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान; केंद्रांवर वेबकास्टिंगसह चोख बंदोबस्त!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, जिल्ह्यातील एकूण ९ हजार १२४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मतदान पथके साहित्यांसह केंद्रांवर रवाना….

मतदानासाठी आवश्यक असलेले साहित्य आणि साधनसामग्री मतदान पथकांना वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी, अशा पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

ओळखपत्र नसले तरी १० पर्यायी कागदपत्रांना मान्यता….

मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र सादर करता न येणाऱ्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने १० पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. त्यामध्ये आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, भारतीय पासपोर्ट, शासकीय किंवा खासगी औद्योगिक संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार व विधान परिषद सदस्यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाचे मूळ पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड (UDID) यांचा समावेश आहे.

त्यामुळे मतदार ओळखपत्र नसलेल्या पात्र मतदारांनी वरील मान्यताप्राप्त पर्यायी कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्र सोबत ठेवावे, जेणेकरून मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

शिक्षकांना विशेष नैमित्तिक रजा; खासगी कर्मचाऱ्यांना चार तासांची सवलत….

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार असलेल्या शिक्षकांना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार तासांची विशेष सवलत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे लक्ष….

निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवरील कामकाजावर प्रशासनाला लक्ष ठेवता येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!