वडगाव तेजन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे दारूबंदी असतानाही काही ठिकाणी लपूनछपून अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील काही ठिकाणी अवैध देशी दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढला आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत असून, गावातील शांतता व सुव्यवस्थेलाही बाधा पोहोचत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थितीची तातडीने पडताळणी करावी, अवैध दारूविक्री सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच अवैध दारूचा साठा जप्त करून अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी आणि पोलिस प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.















