मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील विहिरीवर पिण्याचे पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घातल्याची थरारक घटना मेरा बु. परिसरात घडली. बिबट्याचा हल्ला होताच प्रसंगावधान राखून शेतमजुराने थेट विहिरीत उडी घेतल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंत्री खेडेकर येथील रहिवासी पंजाब दगडू मोरे (वय ५०) हे संजू शिवशंकर खेडेकर यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. ते पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर गेले होते. विहिरीतून पाणी काढत असताना अचानक बिबट्या त्यांच्या पाठीमागून आला आणि त्यांच्यावर झडप घातली. यावेळी बिबट्याचा पंजा पंजाब मोरे यांच्या पाठीला लागल्याने त्यांच्या अंगावरील शर्ट फाटला, तर पाठीला पंज्यामुळे खरचटून जखम झाली.
बिबट्याला समोर पाहताच पंजाब मोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखले आणि जीव वाचवण्यासाठी थेट विहिरीत उडी घेतली. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून त्यांचा जीव बचावला. घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी राजू खेडेकर व समाधान मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी पंजाब मोरे यांना उपचारासाठी अंत्री खेडेकर येथील दवाखान्यात दाखल केले.
दरम्यान, याच परिसरात बिबट्याने रामहरी खेडेकर यांच्या शेतातील गायीचे वासरू ठार केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत असून, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. शेतात काम करताना शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
















