Advertisement Advertisement

सुलतानपूरात आगीचा भडका, दोन दुकानांची राखरांगोळी! फोन लागत नसल्याचा नागरिकांचा आरोप; अग्निशमनच्या उशिरानं संतापाचा भडका!

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पहाटेची वेळ… सारे गाव साखरझोपेत… अन् अचानक आगीच्या ज्वाळांनी सुलतानपूर हादरले! लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे शनिवारी (१७ ऑक्टोबर) पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान लागलेल्या भीषण आगीत दोन व्यावसायिकांची दुकाने जळून खाक झाली. या आगीत अंबादास जुमडे यांच्या कपड्याच्या दुकानासह सतीश इंगळे यांच्या मोटर रिवाइंडिंगच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची मालमत्ता जळाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दोन व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंबादास जुमडे आणि सतीश इंगळे यांच्या दुकानांना अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानांमधील साहित्य आणि माल जळून खाक झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले; मात्र आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाची मदत आवश्यक झाली.

आग लागली, पण १०१ क्रमांकावर फोनच लागेना? या घटनेत अग्निशमन यंत्रणेच्या प्रतिसादावरून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता १०१ क्रमांकावर फोन लागत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. सकाळी ५.१५ वाजल्यापासून सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर पहिली अग्निशमन गाडी तब्बल ६.३० वाजता घटनास्थळी पोहोचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोणार येथील दुसरी अग्निशमन गाडी आग आटोक्यात आल्यानंतर पोहोचल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे अग्निशमन यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या आगीत दोन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच अग्निशमन दलाला संपर्क करण्यात आलेल्या अडचणी आणि घटनास्थळी पोहोचण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सुलतानपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!