मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका २६ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मंगेश सुभाष तोडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, तोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मेरा बु. येथील रहिवासी मंगेश तोडे यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी मंगेश आणि त्याच्या आईवर आली होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आई-मुलगा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मंगेश नैराश्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवारी नेहमीप्रमाणे मंगेश आणि त्याची आई सकाळी सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यानंतर मंगेश घरी परतला. सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईला घरी हा दुर्दैवी प्रकार निदर्शनास आला. मुलाची अवस्था पाहून आईने आक्रोश केला. तिचा आवाज ऐकून शेजारील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली आहे. या घटनेने मेरा बु. गावात शोककळा पसरली आहे.














