Advertisement Advertisement

“लपून छपून लग्न लावाल तर थेट जेलची हवा खाल! “भटजी, वाजंत्री, मंडपवाल्यांनाही आता सूट नाही; बालविवाहात सगळेच अडकणार!” बातमी मध्ये नंबर दिला गुपचूप कॉल करा ..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अक्षयतृतीयेचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जात असला तरी या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सतर्कता वाढविली आहे. १९ एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.

भारतीय कायद्यानुसार मुलाचे किमान वय २१ वर्षे व मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील तसेच अंगणवाडी सेविका यांनी विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासून खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून केवळ पालकच नव्हे, तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वन्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात.

दोषींना दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. गावात किंवा परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस विभागाच्या ११२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, संशयास्पद विवाहांची माहिती त्वरित देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!