Advertisement Advertisement

आषाढी वारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातून २५६ एसटी बसेस सज्ज; वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी धावली!

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सात आगारांतून एकूण २५६ जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ३३ पॅकेज टुर्स आणि २२३ जादा बसफेऱ्यांचा समावेश आहे.

शनिवार, २५ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने १९ जुलैपासून अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. समूह बुकिंग करणाऱ्या वारकऱ्यांसाठी थेट गावातून पंढरपूरपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, कमी प्रवासी असलेल्या काही नियमित फेऱ्या तात्पुरत्या रद्द करून त्या बसेस वारी सेवेसाठी वापरण्यात येत आहेत.

बुलढाणा आगारातून ४३, चिखली ३९, खामगाव ३४, मेहकर ४५, मलकापूर ३२, जळगाव जामोद ३० आणि शेगाव ३३ अशा एकूण २५६ बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्या आहेत. १९ जुलै रोजी ३३, २० जुलैला ४२, २१ जुलैला ४५, २२ जुलैला ४८ आणि २३ जुलैला ८८ बसेस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या. दर्शनानंतर भाविकांच्या परतीसाठी या बसेस २७ व २८ जुलैपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

पंढरपूर वारीसाठी अमरावती विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिंगबर जाधव यांची यात्रा प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, यंत्र अभियंता विनोद इलामे, विभागीय वाहतूक अधीक्षक गोविंद जवंजाळ आणि अधीक्षक विजय निकम यांच्याकडे सहायक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकाधिक भाविकांनी एसटी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा विभागाच्या विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!