Advertisement Advertisement

भाजीपाला विक्रीसाठी घरातून निघालेला ४३ वर्षीय इसम बेपत्ता; मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल!

मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील मुकुंद नगर परिसरातील ४३ वर्षीय इसम भाजीपाला विक्रीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी नागरिकांना संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास तातडीने कळविण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग. भा. सुमन नामदेव सोनोने (वय ६८, रा. मुकुंद नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सापुर्डा नामदेव सोनोने (वय ४३) हा २१ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजता “भाजीपाला विकण्यासाठी गावात जातो,” असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

कुटुंबीयांनी त्याचा मित्र, नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

बेपत्ता असलेल्या सापुर्डा सोनोने यांचा रंग निमगोरा, केस काळे, उंची अंदाजे ५ फूट ५ इंच असून अंगात पांढऱ्या रंगाचा कुर्ता, कथ्थई रंगाची पँट आणि पायात साधी चप्पल होती, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी मिसिंग क्र. ५२/२०२६ नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ रविंद्र दळवी करीत आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!