Advertisement Advertisement

इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम; लग्नाचं आमिष दाखवून तीन वर्षे शोषण, तरुणाविरुद्ध बलात्कार व पॉक्सोचा गुन्हा!उच्च न्यायालयातून आरोपीला अटकपूर्व जामीन; न्यायासाठी पीडितेची माध्यमांकडे धाव….

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात रूपांतर झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप खामगावातील एका तरुणावर करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी आरोपीविरुद्ध बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, न्याय मिळावा यासाठी पीडित तरुणीने २३ जुलै रोजी माध्यमांकडे धाव घेत आपली व्यथा मांडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संत विहार कॉलनी, घाटपुरी (ता. खामगाव) येथील गोविंद हरीहर घ्यार याची २०२३ मध्ये त्यावेळी १६ वर्षीय असलेल्या पीडितेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री वाढल्यानंतर आरोपीकडे पीडितेचे काही फोटो होते. हे फोटो हटविण्याच्या बहाण्याने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याने पीडितेला आपल्या घरी बोलावल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने प्रेम व्यक्त करत लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पुन्हा घरी बोलावून, “तुझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न करू,” असे सांगत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही लग्नाचे आश्वासन कायम ठेवले; मात्र ११ मे २०२६ रोजी आरोपीने लग्नास नकार दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

यानंतर पीडितेने २० मे २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोविंद हरीहर घ्यार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९, ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. दुसरीकडे, न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत पीडितेने माध्यमांसमोर आपली आपबिती मांडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!