नाशिक (बुलडाणा कव्हरेज न्यूज):नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात प्रेमसंबंधाचा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक शेवट समोर आला आहे. दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या रागातून पहिला प्रियकर साहिल लाव्हारे याने वैष्णवी अनिल आवारे या तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांचा शोध सुरू असतानाच आरोपी साहिलनेही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी आवारे ही इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटी परिसरातील एका पीजीमध्ये राहत होती. तिचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरले होते. शुक्रवारी (१७ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास तिची पहिला प्रियकर साहिल लाव्हारे याच्यासोबत भेट झाली. यावेळी दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला.
याच दरम्यान वैष्णवीच्या होणाऱ्या पतीशी तिचा मोबाईलवर संपर्क सुरू होता. त्यामुळे दोघांमधील वाद त्याने फोनवर ऐकला. काही क्षणांतच संतापलेल्या साहिलने वैष्णवीवर चाकूने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली.
हत्या केल्यानंतर साहिलने फोनवर वैष्णवीच्या होणाऱ्या पतीला, “वैशूला आज संपवलं,” असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर “तू कुठे आहेस? इथे पोहोचायला किती वेळ लागेल?” असा प्रश्नही त्याने विचारल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या संभाषणानंतर संबंधितांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये वैष्णवीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर आरोपी साहिलचा शोध सुरू करण्यात आला.
मात्र, शनिवारी (१८ जुलै) पहाटे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका झाडाला साहिल लाव्हारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. वैष्णवीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःचेही जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
या दुहेरी मृत्यूमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून, इंदिरानगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












