देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):तालुक्यातील सावखेड भोई येथे सार्वजनिक ठिकाणी हातात चाकू घेऊन शिवीगाळ, आरडाओरड करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत शेषराव जाधव (वय ४५, रा. सावखेड भोई) हे १६ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शेतातून घरी जात होते. त्यावेळी गावातील शिवाजी महाराज चौकात आरोपी सचिन काशीनाथ वाडेकर (वय ३४, रा. सावखेड भोई) हा हातात चाकू घेऊन अश्लील शिवीगाळ व आरडाओरड करत असल्याचे त्यांना दिसले.
फिर्यादी यांनी आरोपीला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वागू नको, असे सांगितले असता त्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली. तसेच हातातील चाकूचा धाक दाखवत फिर्यादीसह परिसरातील इतर नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे चौकात काही काळ भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सचिन काशीनाथ वाडेकर याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३२१/२०२६ नोंद केला असून भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५१(२), ३५१(३) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.













