मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शेळगाव आटोळ येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सतत शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. प्रिया प्रमोद जाधव (वय २३, रा. शेळगाव आटोळ) यांचा विवाह २२ जून २०२५ रोजी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे प्रमोद सूर्यभान जाधव, हे महानगरपालिकेच्या एसटी बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेल्या युवकासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर पती व सासरच्या मंडळींनी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मागणी पूर्ण न झाल्याने पती, सासू, दिर आणि नणंद यांनी विवाहितेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. शिवीगाळ, मारहाण तसेच नोकरी करू नये म्हणून तिची शैक्षणिक कागदपत्रे घरात लपवून ठेवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय तिला आई-वडिलांशी संपर्क साधण्यास व माहेरी जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
सततच्या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने अंढेरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्रमोद सूर्यभान जाधव, कमलबाई सूर्यभान जाधव, चंद्रभान सूर्यभान जाधव, प्रवीण सूर्यभान जाधव, स्नेहल सुनील अहिरे आणि जयमाला भारत वाकीकर (रा. गिरडा पाडळी, जि. बुलढाणा, ह.मु. गणेश नगर, भीम संदेश कॉलनी, पडेगाव, जि. संभाजीनगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८५, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.












