Advertisement Advertisement

मुलीला कुत्र्याने चावले; मग तू पोलीस ठाण्यात का गेल्या म्हणत महिलेच्या घरात घुसून मारहाण; चौघांवर गुन्हा….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जळगाव जामोद शहरातील आठवडी बाजार परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. रंजना दिलीप तायडे (वय ३६, रा. आठवडी बाजार, जळगाव जामोद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीला आरोपींच्या दोन पाळीव कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेबाबत त्यांनी ४ जून २०२६ रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीचा राग मनात धरून सुरेश देविदास तायडे, रिना सुरेश तायडे, किरण सुरेश तायडे आणि अमन सुरेश तायडे हे ११ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजता फिर्यादीच्या घरी गेले. तेथे त्यांनी “तू पोलीस स्टेशनला रिपोर्ट कसा दिला?” अशी विचारणा करत शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

श्रवणयंत्राचेही नुकसान….

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आईला ऐकू येत नसल्याने त्यांनी कानाला श्रवणयंत्र लावले होते. धक्काबुक्कीदरम्यान ते खाली पडून त्याचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल….

या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५२, ३५१(२), ३३३, ३(५) तसेच अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ संजय वेरुळकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!