बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील शामनगर परिसरात शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी एका २९ वर्षीय युवकाचा १३२ केव्ही उच्चदाब विद्युत टॉवरवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. धीरज बबनराव सनगाळे (वय २९, रा. शामनगर, बुलढाणा) असे मृत युवकाचे नाव असून, तो सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, धीरज सनगाळे हा शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. त्यानंतर काही वेळाने शामनगर परिसरातील १३२ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरखाली एक युवक पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहणी केली असता तो धीरज सनगाळे असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, धीरजने विद्युत टॉवरवरून उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास एपीआय मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत.
या घटनेमुळे शामनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सनगाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












