Advertisement Advertisement

बुलडाणा कव्हरेज बातमीचा इम्पॅक्ट! डोणगाव दामिनी पथकाची धडक कारवाई; टवाळखोरी करणारे पाच तरुण ताब्यात….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव परिसरातील दामिनी पथकाच्या कार्यप्रणालीबाबत बुलडाणा कव्हरेजने आज सकाळी प्रकाशित केलेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत पोलिस प्रशासनाने धडक कारवाई केली. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या तसेच टवाळखोरी करणाऱ्या पाच तरुणांना डोणगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने ताब्यात घेतले.

पोलिसांनी संबंधित पाचही तरुणांवर प्रतिबंधक कारवाई केली. त्यानंतर त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आणि भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, अशी ताकीद देत तरुणांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून डोणगाव बसस्थानक परिसर तसेच शाळा व महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत काही टवाळखोर तरुण विद्यार्थिनींची छेड काढत असल्याच्या आणि संशयास्पदरीत्या वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने परिसरात गुप्तपणे गस्त सुरू करून संशयितांवर नजर ठेवली.

या मोहिमेदरम्यान टवाळखोरी करताना आढळलेल्या पाच तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांना किंवा विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला.

बुलडाणा कव्हरेजच्या वृत्ताची तात्काळ दखल घेत झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, टवाळखोरांवर पोलिसांनी वचक निर्माण केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!