मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील अहमदशाहपूरा परिसरात शाळकरी मुलांकडून ट्युशन फी भरण्यासाठी दिलेले १६ हजार रुपये जीवे मारण्याची धमकी देत हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास अहमदिया मशिदीजवळ घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदशाहपूरा येथील सय्यद अलीयार सय्यद सुलतान (वय ३८) हे नंदुरबार येथे जाणार असल्याने त्यांनी आपल्या शाळकरी मुलांना ट्युशन फी भरण्यासाठी १६ हजार रुपये दिले होते. पैसे घेऊन मुले घरी जात असताना अहमदिया मशिदीजवळ दोन जणांनी त्यांना अडविले.
यावेळी एका आरोपीने मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पकडून ठेवले, तर दुसऱ्या आरोपीने मुलाच्या खिशातील १६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. मात्र, नागरिक येत असल्याचे पाहून दोन्ही आरोपी तेथून पसार झाले.
या घटनेनंतर मुलांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी शेख हाफीज शेख रशीद उर्फ जाधव आणि मो. रेहान शेख बुडन उर्फ रिजवान बिल्डर यांच्याविरुद्ध जबरी चोरीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.












