वर्दडी बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज): किनगाव राजा येथून जवळच असलेल्या वर्दडी बुद्रुक गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत एकाचवेळी पाच दुकाने फोडून सुमारे ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील आटोळे यांनी नेहमीप्रमाणे १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपले आराध्या मेडिकल जनरल स्टोअर्स बंद केले होते. मात्र, १६ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता त्यांना फोनद्वारे दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाचे शटर फोडलेले दिसून आले. गल्ल्यातील सुमारे १४ हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांनी पाहिले.
याचदरम्यान परिसरातील इतर दुकानेही चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे उघड झाले. अनिल काकडे यांच्या पूजा किराणा स्टोअर्स मधून २२ हजार रुपये, सुरेश काकडे यांच्या बालाजी जनरल स्टोअर्स मधून १५ हजार रुपये, विजय लिपने यांच्या जय गजानन पाणीपुरी सेंटर मधून १० हजार रुपये चोरीस गेले. तसेच रवींद्र नागरे यांच्या श्री मेडिकल चे शटर तोडून नुकसान करण्यात आले.
ही घटना पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एका ट्रॅक्टर चालकाच्या निदर्शनास आली. त्याने संबंधित दुकानदारांना माहिती दिल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता.
घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता तीन संशयित पुरुष दिसून आले असून त्यापैकी एकाने चेहरा झाकलेला असल्याचे समोर आले आहे. किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विश्वास काकडे करीत आहेत.
दरम्यान, सलग दुकाने फोडल्याच्या या प्रकारामुळे गावातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.















