Advertisement Advertisement

UDID शिवाय अर्थसहाय्य थांबणार; दिव्यांग लाभार्थ्यांना तहसीलदारांचा सुचना…

चिखली (अंकुश पाटील: बुलडाणा कव्हरेज न्युज) विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा अर्थसहाय्यासाठी आता दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या 27 मार्च 2026 रोजीच्या निर्णयानुसार ही अट लागू करण्यात आली असून, तहसीलदार विजय सवडे यांनी याबाबत सर्व लाभार्थ्यांना सूचना दिल्या आहेत.

सध्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रातील UDID क्रमांक DBT पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप UDID क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र व आधारकार्डची छायांकित प्रत तहसील कार्यालयात जमा केलेली नाही, त्यांनी तात्काळ कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID प्रमाणपत्र नाही, त्यांनी ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे वैद्यकीय अधिक्षकांशी संपर्क साधून UDID नोंदणी करून घ्यावी. शासन निर्देशानुसार, UDID प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील महिन्यापासून अर्थसहाय्य बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ग्रामीण रुग्णालय चिखली येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिबीर आयोजित केले जाते. या शिबिराचा लाभ घेऊन सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले UDID तयार करून घ्यावे, असेही तहसीलदार विजय सवडे यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!