Advertisement Advertisement

अंढेरा फाट्यावर पोलिसांचा सापळा; रेतीवाल्यांचा खेळ खल्लास! एक-दोन नाय, तब्बल पाच टिप्पर पकडले; ९९ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध रेती वाहतुकीचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीने भरलेले पाच टिप्पर जप्त केले. या कारवाईत पाच टिप्पर आणि त्यातील रेती असा एकूण ९९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास अंढेरा फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी अंढेरा पोलीस पथक गस्तीवर असताना देऊळगाव महीकडून अंढेरा फाट्याच्या दिशेने काही टिप्परमधून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची दखल घेत पोलिसांनी अंढेरा फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी रेतीने भरलेले पाच टिप्पर पोलिसांनी अडवले. वाहनचालकांकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी पाचही टिप्पर रेतीसह जप्त केले.

या कारवाईत टिप्पर क्रमांक एमएच २८ बीएक्स १८९९ (किंमत २० लाख १० हजार रुपये), त्यातील चार ब्रास रेती (किंमत २४ हजार रुपये); एमएच २८ बीबी ७७९८ (किंमत १७ लाख रुपये), त्यातील दोन ब्रास रेती (किंमत १२ हजार रुपये); एमएच २८ बीबी ८६८३ (किंमत २२ लाख २० हजार रुपये), त्यातील चार ब्रास रेती (किंमत २४ हजार रुपये); एमएच ३७ जे १६२३ (किंमत १८ लाख १० हजार रुपये), त्यातील चार ब्रास रेती (किंमत २४ हजार रुपये); तसेच एमएच २८ बीबी ०१७८ (किंमत २१ लाख १० हजार रुपये), त्यातील चार ब्रास रेती (किंमत २४ हजार रुपये), असा एकूण ९९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस हवालदार सिद्धार्थ सोनकांबळे यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून जीवन महादू वाघ (वय १९), गणेश दिलीप इंगळे (वय २२), विजय रंगनाथ तारू (वय ४०) आणि पवन विजय इंगळे (वय २२, सर्व रा. भानखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा), तसेच अनिकेत गजानन घोरपडे (वय २१, रा. संभाजीनगर, चिखली) या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि गौण खनिज अधिनियमातील कलम २१(१) व २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे, पोलीस हवालदार किशोर जाधव, सिद्धार्थ सोनकांबळे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन फुसे आणि श्रीकांत पव्हरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!