Advertisement Advertisement

दुष्काळाचं संकट गडद होण्याआधीच कामाला लागा! पशुधनासाठी चारा-पाणी, तर शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाचं नियोजन करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देण्यासह नदीपात्रांच्या खोलीकरणावर भर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचे संकट गडद होत असताना पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच लोकसहभागातून धरणांतील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासह नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, शेतीसाठी पाण्याची गरज आणि पशुधनासाठी चारा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, गावपातळीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि भविष्यातील गरजांचा विचार करून उपाययोजना राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पिण्याच्या पाण्यानंतर तुरीच्या पिकाला संरक्षित सिंचन!

धरणांतील उपयुक्त जलसाठा आणि मृतसाठा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करावे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून खरिपातील तूर पिकाला संरक्षित सिंचन देता येईल का, याची शक्यता तपासावी, असे निर्देश प्रतापराव जाधव यांनी दिले. पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची गरज सर्वोच्च प्राधान्याने भागवून शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नदीपात्रातील दगडांचे अडथळे दूर करा!

जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील सातपुडा पर्वतरांगांतून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगड साचल्याने नदीप्रवाहाची रुंदी कमी झाल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे लोकसहभागातून नदीपात्रातील अडथळे दूर करून खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशा कामांमुळे पाण्याच्या प्रवाहाला मदत होण्यासोबतच जलसंधारणाच्या दृष्टीनेही फायदा होऊ शकतो.

धरणांतील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात; चारा-पाण्याचेही नियोजन!

धरणांतील गाळ लोकसहभागातून काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, असेही जाधव यांनी सांगितले. यामुळे धरणांतील गाळाचा शेतीसाठी उपयोग होण्यासोबतच जलसाठ्यांची क्षमता वाढविण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे, दुष्काळाची तीव्रता वाढल्यास पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून संभाव्य गरजांचा अंदाज घेऊन आधीच तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, संरक्षित सिंचन आणि पशुधनासाठी चारा-पाणी नियोजन या उपाययोजनांवर बैठकीत भर देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!