बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात सध्या एकदम वेगळीच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीय रं बापा! पण ही आपत्ती रुग्णालयातली नाही, तर घराघरातली,नात्यांची, विश्वासाची आणि उद्ध्वस्त होणाऱ्या संसारांची. गेल्या काही महिन्यांपासून रोज सरासरी ८ ते १० मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना समोर येतायत. आधी या गोष्टी “प्रेमप्रकरण” म्हणून सोडून दिल्या जात होत्या, पण आता त्यामागे भोंदूगिरी, काळा जादू आणि टोळ्यांचं जाळं असल्याची चर्चा रंगू लागलीय.
चिखली तालुक्यातून एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यात एक भोंदूबाबा एका अल्पवयीन मुलीला “वशीकरण” आणि “मंत्र”च्या नावाखाली घरातून पळ काढायला भाग पाडताना ऐकू येतो. “लिंबू लपव, मंत्र टाक… कुणी पकडणार नाही… सहा महिने बाहेर राहा…” अशा शब्दांनी तो त्या मुलीला फसवत आहे.
ही क्लिप म्हणजे फक्त एक उदाहरण असू शकतं, पण जिल्ह्यात अशा कितीतरी भोंदूंचं जाळं पसरलं असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर स्वप्न रंगवणारी तरुणाई वास्तव विसरत चाललीय. आई-बापाचं कष्टाचं आयुष्य बाजूला ठेवून, या मुली अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकतायत.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांत चारशेहून अधिक महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहेत. काही परत आल्या असतील, पण ज्या आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त झाल्या, त्यांचं काय?
पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. केवळ “मिसिंग” दाखल करून जबाबदारी संपत नाही.
“मुलगी सज्ञान आहे” असं सांगून हात झटकणं, हा उपाय नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पालक देत आहेत.
कायद्याची ढाल की गुन्हेगारांची मोकळीक?
सज्ञान मुलींना कायद्याचं संरक्षण मिळत असलं, तरी त्यांचं मानसिक शोषण कोण करतंय, कोण फूस लावतंय, याचा तपास होणं गरजेचं आहे.
अंधश्रद्धेचं डिजिटल जाळं!
आजकाल मोबाईलवरूनच भोंदू लोक मुलींना गाठतायत. पैशाचा पाऊस, वशीकरण, लग्नाचं आमिष देऊन त्यांना फसवलं जातंय.
चिखलीतला प्रकार हा फक्त एक नमुना आहे. जिल्ह्यात अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करून “सर्जिकल स्ट्राईक” करण्याची मागणी जोर धरतेय.










