Advertisement Advertisement

इन्स्टावर स्टाईल मध्ये फोटो टाकला अन् रुबाब दाखवला… अन् पोलिसांनी थेट उचललाच!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर हातात धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करणारा फोटो पोस्ट करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. सायबर सेलच्या सोशल मीडिया मॉनिटरिंगदरम्यान ही बाब उघडकीस आली असून, आरोपीकडून ४०.५ सेंमी लांबीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इन्स्टाग्राम खात्यावर हातात धारदार शस्त्र घेऊन काढलेला फोटो प्रसारित करण्यात आला होता. सोशल मीडिया मॉनिटरिंगदरम्यान हा फोटो आढळल्यानंतर सायबर सेलने तातडीने तपास सुरू केला. तपासात संबंधित इन्स्टाग्राम खाते तेलगू नगर येथील शेख शहबाज शेख रशीद (वय १९) याचे असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर मंगळवारी (दि. २८) बुलढाणा शहरातील राणी बगीचा परिसरातील एका फळविक्रीच्या दुकानातून पोलिसांनी शेख शहबाज याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित चाकू घरी असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता काळ्या रंगाच्या कव्हरमध्ये ठेवलेला धारदार चाकू जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या चाकूची एकूण लांबी ४०.५ सेंमी, तर पात्याची लांबी २७.५ सेंमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी शेख शहबाज शेख रशीद याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!