मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : मेहकर शहरातील जानेफळ चौक परिसरात कारमध्ये धारदार तलवार बाळगून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला मेहकर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातील तलवारीसह कारही जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी जानेफळ चौकात उभी असलेल्या एमएच ३७ जी ५१७० क्रमांकाच्या कारमध्ये विशाल अशोक गायकवाड (रा. दिवाणी कोर्टाजवळ, मेहकर) हा धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. चौकशीत संबंधिताकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अधिकारी अशोक गाढवे, विजय बेंडवाल, प्रभाकर शिवणकर, लक्ष्मण कटक, मोहम्मद परसुवाले, गणेश वैद्य, मनीष बाजड आणि शिवाजी चिम यांनी सहभाग घेतला.














