Advertisement Advertisement

उपवर्गीकरणावरून बुलढाणा पेटला…!उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी समाजाचा विराट महामोर्चा; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी…..

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात बुलढाण्यात समस्त आंबेडकरी समाज आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरणविरोधी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (२९ जुलै) विराट जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. हजारो समाजबांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, अशी ठाम मागणी केली.

महामोर्चापूर्वी जिजामाता प्रेक्षागृह मैदानावर मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चादरम्यान सहभागी नागरिकांच्या हातातील फलक आणि सरकारविरोधातील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले. “उपवर्गीकरणाची प्रक्रिया तत्काळ रद्द करा”, “माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल तातडीने जाहीर करा”, “अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचे व्यापक सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध करा” अशा मागण्यांचे फलक झळकत होते.

या महामोर्चाला सरसेनानी आनंदराज आंबेडकर, खासदार चंद्रकांत हांडोरे, भीमरावजी आंबेडकर, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, आमदार सिद्धार्थ खरात, भाई दीपक केदार, भानुदास विसावे, भाई अशांत वानखेडे, डॉ. सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक नेत्यांचे नेतृत्व लाभले. स्टेट बँक चौक येथे महामोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले.

सभेत बोलताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयावर टीका करत, महाराष्ट्रातील बहुसंख्य अनुसूचित जाती या निर्णयाच्या विरोधात असल्याचा दावा केला. सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून छोट्या जातींचे नुकसान होईल, असा आरोप त्यांनी केला.

माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनीही सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाने एकत्र राहण्याचे आवाहन केले. तर भाई अशांत वानखेडे यांनी महार-मातंग समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, “सरकारकडे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी आवश्यक इम्पिरिकल किंवा क्वांटिफाईड डेटा नाही. जाणूनबुजून जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे,” असा आरोप केला. तसेच, “आगीशी खेळू नका, भाजल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

सभेला आशिषबाबा खरात, दिलीपराव जाधव, कैलास सुखदाणे, भाई विजय सावळे, गौतम गवई, दादासाहेब काटकर, अॅड. वैशाली ठाकरे, इंजि. विजय मोरे, विजय राऊत, निलेश गायकवाड, दिलीप राजभोज, प्रतिक जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुणाल पैठणकर यांनी, तर आभार प्रदर्शन विनोद इंगळे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!