Advertisement Advertisement

सकाळच्या शाळांचा फटका पोषण आहाराला; विद्यार्थ्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब, बेचव खिचडीवरच निभाव!बीएलओ कामामुळे शिक्षकांची धावपळ; मेहकर तालुक्यातील शाळांमध्ये पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू झाल्यानंतर शिक्षकांवर निवडणूक विभागाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत बीएलओची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची मोठी धावपळ सुरू असून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्यापासून अनेक शाळांमध्ये पोषण आहारातील पालेभाज्या गायब झाल्याने विद्यार्थ्यांना बेचव खिचडी खावी लागत असल्याची चर्चा आहे.

निवडणूक विभागाच्या कामामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ६ जुलैपासून अनेक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्या. बहुतांश शिक्षक व मुख्याध्यापक हे मुख्यालयी राहत नसून अप-डाऊन करतात. पूर्वी शाळेत येताना पोषण आहारासाठी आवश्यक पालेभाज्या आणण्याची पद्धत होती. मात्र, सकाळच्या वेळेमुळे ही व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक शाळांमध्ये पालेभाज्यांशिवायच खिचडी तयार केली जात असल्याचा आरोप होत आहे.

शासनाच्या नियमानुसार पोषण आहारामध्ये मेनूनुसार पालेभाज्यांचा समावेश करणे तसेच आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार देणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाकडून इंधन व पालेभाज्यांचा स्वतंत्र खर्चही दिला जातो. इयत्ता १ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी २ रुपये ५९ पैसे, तर इयत्ता ६ ते ८ साठी ३ रुपये ११ पैसे इतका अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याची चर्चा आहे.

मेहकर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५९ शाळांमध्ये सुमारे १२ हजार ३०० विद्यार्थी, नगरपालिकेच्या ११ शाळांमध्ये १ हजार ५० विद्यार्थी आणि अनुदानित शाळांमध्ये सुमारे १४ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. मात्र, पालेभाज्या आणि पूरक पोषण आहाराच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोषण आहारासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही विद्यार्थ्यांच्या ताटात पालेभाज्या दिसत नसल्याने या निधीचा योग्य वापर होत आहे का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोषण आहाराची नियमित तपासणी करून वस्तुस्थिती पडताळावी आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!