नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नांदुरा शहरातील दोन अल्पवयीन मुलांचा पूर्णा नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना १२ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नांदुरा शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक शिवा वानखडे (वय १२) आणि कृष्णा बाळू भोपळे (वय १४), दोघेही रा. वार्ड क्रमांक १, नांदुरा, हे पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यांना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. संध्याकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे नांदुरा शहरात शोक व्यक्त केला जात असून, पावसाळ्यात नदी-नाल्यांमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी आणि विशेषतः अल्पवयीन मुलांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.












