मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद हायस्कूल येथील काही शिक्षकांच्या कथित अकार्यक्षम व निष्काळजी कारभाराविरोधात शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित शिक्षकांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा १३ जुलै २०२६ पासून शाळेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच कारवाई होईपर्यंत संबंधित शिक्षकांना शाळेत प्रवेशबंदी करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनानुसार, काही वर्षांपूर्वी शाळेतील काही शिक्षकांच्या उदासीन कारभारामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन प्राचार्य वसंतराव गाडेकर आणि ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे यांनी उपोषण करून गावातील विद्यार्थ्यांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी मिळाल्यानंतर सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी पुन्हा या शाळेत प्रवेश घेतला.
यानंतर प्राथमिक विभागातील नव्याने नियुक्त शिक्षकांनी दर्जेदार अध्यापन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणली. त्याची दखल घेत शासनाने या शाळेची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड केली. मात्र, काही शिक्षक अद्यापही कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यांच्या निष्काळजीपणाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित शिक्षकांना अनेकदा समज देऊन सुधारण्याची संधी दिली. मात्र, त्यात कोणतीही सुधारणा न झाल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी समितीने एकमताने ठराव मंजूर करून संबंधित शिक्षकांवर प्रशासकीय कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे पाठविली होती.
या प्रकरणात दत्तात्रय गोविंदा वांजोळ, रविकुमार एकनाथ शेळके, प्रशांत देविदास डहाळे, अविनाश श्रीराम घुगे आणि गजानन गोसावी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
त्यामुळे संबंधित शिक्षकांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा १३ जुलैपासून शाळेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. तसेच कारवाई होईपर्यंत संबंधित शिक्षकांना शाळेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर मनोहर संतोष शिंदे, नितीन रवींद्र तांबट, स्वप्निल रमेश कठाळे, रामेश्वर सुधाकर धमक, अनिल आत्माराम अंभोरे आणि श्याम दीपक आढाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.















