देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील असोला फाट्यानजीक मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालविल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल पवन दादाराव दुनघू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश पाटलिया जबुराई (वय ३४, रा. साई विहार कॉलनी, इंदूर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३११/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर मोटार वाहन कायद्यातील कलम १८५, १३० व १७७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, १० जुलै रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने एमपी-०९-एचजे-७०७९ क्रमांकाचा ट्रक मद्यप्राशन करून देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील असोला फाट्यानजीक भरधाव व निष्काळजीपणे चालविला. यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून वाहन पलटी झाले.
अपघातानंतर पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, देऊळगाव राजा पोलीस पुढील तपास करीत आहेत.













