बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट शिवारात उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरून शेतकरी महिला व तिच्या तीन मुलांवर लाठी-काठ्या, लोखंडी रॉड, फावड्याचे दांडे आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आयेशा बेगम अब्दुल मजीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या शनिवारी सकाळी शेतात काम करत असताना शेजारील शेख वकील शेख गणी याने त्यांच्या उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेण्याचा आग्रह धरला. त्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील सुमारे २ तोळे सोन्याची पोत (अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये) हिसकावून नेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, आईला वाचवण्यासाठी धावून आलेले अब्दुल मुंतजीम अब्दुल मजीद, अब्दुल कलीम अब्दुल मजीद आणि अब्दुल रहीम अब्दुल मजीद यांच्यावरही आरोपींनी लोखंडी रॉड, फावड्याचे दांडे आणि कोयत्याने हल्ला केला. या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेख गफार शेख गणी, शेख वकील शेख गणी, शेख सत्तार शेख गणी, शेख शहेजाद शेख गफार, शेख मुकीम शेख जैनु, शेख साहिल शेख वकील, शेख मुख्तार शेख गफार (सर्व रा. देऊळघाट) तसेच शेख मोईन शेख अयाज (रा. बुलढाणा) यांच्याविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.












