देऊळगाव राजा (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जप्त केले. जप्त केलेली वाहने पुढील दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आली आहेत.
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता टाकरखेड भागिले शिवारातील धरण कमानीजवळ महसूल पथकाने अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पकडला. कारवाईदरम्यान वाहन जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई मंडळ अधिकारी विजय हिरवे व ग्राम महसूल अधिकारी संजय बरांडे (मेहुणा राजा) यांनी केली.
यापूर्वी ३० जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता खल्याळ गव्हाण परिसरातही महसूल विभागाने कारवाई करत एमएच २८ बीबी ९०९६ क्रमांकाचा सुमारे ३ ब्रास रेतीने भरलेला टिप्पर पकडला होता. तपासणीदरम्यान चालकाकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे आढळून आली नाहीत. चौकशीत संबंधित टिप्पर भगवान वाघमारे यांचा असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर वाहन पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आले.
या कारवाईत महसूल सेवक कविता शिरसाट यांनीही सहभाग घेतला. महसूल प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.















